रम्य ही स्वर्गाहून लंका!

रम्य ही स्वर्गाहून लंका

 

 

रम्य ही स्वर्गाहून लंका

हिच्या कीर्तीच्या सागरलहरी नादविती  डंका!

लंका, श्रीलंका! कुबेराने उभारलेली, लंकाधिपती, जगज्जेत्या रावणाची सुवर्णनगरी!  लंका शब्दाबरोबर आपल्या डोळ्यांसमोर तरळतो तो रामायण!  रामायणातील राम-रावणाचा संघर्ष, असत्यावर आणि अन्यायावर मिळवलेला विजय, सीतामाईचे पावित्र्य, रामाची सीतामाईसाठी असलेली एकनिष्ठा, भारताचे बंधुप्रेम, मातृपितृप्रेम, पुत्रप्रेम, प्रजेला पुत्रवत मानणारा राजा, स्वामीभक्त हनुमान, शबरीची पवित्र भक्ती इत्यादी आणि अशाच अनेक सद्गुणांचा परिपाक म्हणजेच रामायण! आपले महत्भाग्य कि आपणं ह्या पवित्र भारतभूमीत जन्माला आलो, जिथे प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला.  

ज्या रावणाने सीतामाईला पळवून नेले, सीतामाईला जिथे असंख्य दुःखiना सामोरे जावे लागले आणि नंतर प्रभू रामचंद्रांनी सीतामाईला तिथून सोडवून आणले, त्या लंकेला भेट देण्याचा नुकताच योग्य जुळून आला.  

मित्रपरिवारसह लंकेच्या त्या पवित्र भूमीवर जेव्हा आम्ही पोहोचलो, त्यावेळेस सूर्यदेव नुकतेच आपल्या सुवर्णरथावर आरूढ होऊन आपली तेजस्वी किरणे संपूर्ण जगावर पांघरण्यासाठी अवतरत होते.  त्या पवित्र सूर्याला वंदन करून, कुबेराच्या त्या सुवर्णनगरीला मी मनोमन वंदन केले. थोडावेळ आराम करून आम्ही सगळे श्रीलंका पाहण्यासाठी सज्ज झालो.  तसं पाहिलं तर माणसं ही  सगळीकडे सारखीच असतात, बदलतात ते भूप्रदेश आणि संस्कृती!

श्रीलंकेला निसर्गाचे भरभरून प्रेम मिळाले आहे.  प्राकृतिक सौंदर्याने नटलेला हा देश आपल्या नैसर्गिक सौंदर्याचे दर्शन घडवतो.  त्यातील माझ्या मनाला स्पर्शून गेलेले ठिकाण म्हणजे ‘नुवारा एलीया’.  नुवारा एलीयाजवळच प्रसिद्ध ‘अशोक वाटिका’ आहे.  हे ठिकाण श्रीलंकेमध्ये ‘हाकगला बोटॅनिकल गार्डन’ म्हणून प्रसिद्ध आहे.  श्रीलंकेमध्ये बौद्धधर्मीय जास्त आहेत आणि त्यानंतर हिंदुधर्मीय लोकवस्ती.  येथील मंदिरांवर भारतीय दक्षिण स्थापत्य कलेचा प्रभाव जास्त दिसून येतो.  आपल्या दक्षिण भारतात जशी मंदिरे आहेत तशीच मंदिरे तेथे आहेत.  सीतामंदिरातील अनेक देवी-देवतांच्या मुर्त्यांचे दर्शन घेऊन आम्ही अशोकवाटिकेसाठी मार्गक्रमण केले.  अशोक वाटिका सीता मंदिराजवळ आहे.  अतिउत्सुकतेने आम्ही अशोकवाटिकेत पोहोचलो.  हे हेच ठिकाण आहे जिथे रावणाने सीतामाईला बंदिस्त करून ठेवले होते, इथेच हनुमानाने सीतेला रामाने दिलेली अंगठी दाखवून आपली ओळख पटवून दिली होती, लंका दहनानंतर इथल्याच पाण्यात हनुमानाने त्याच्या शेपटीची आग विझवली होती.  अशोक वाटिकेचे दर्शन घेऊन मन धन्य झालं.

अशोकवाटिकेनंतर अजून एक प्रेक्षणीय महत्वाचे ठिकाण म्हणजे सिगिरिया – लायन रॉक ऑफ श्रीलंका.  श्रीलंकेतील लोकांच्या मते ही जागा जगातील आठवे आश्चर्य आहे.  राजा कश्यपाने येथे भव्य असे किल्ले बांधले.  महाकाय सिंहाची कोरीव कलाकृती पाहिल्यानंतर येथील किल्ल्यांच्या भव्यतेची कल्पना येते.  राजा कश्यपाच्या निधनानंतर या जागेवर १४ शतकापर्यंत बौद्धधर्मियांचे विहार होते.

0d

राजा कश्यपाच्या अगोदर येथे रावणाचा महाल होता आणि नंतर तो राजा कश्यपाने पुनर्स्थापित केला, अशीही आख्यायिका आहे.  श्रीलंकतील स्थानिक लोकांच्या मते, रावण अजूनही श्रीलंकेतील एका मोठ्या गुहेत जिवंत आहे आणि ते ठिकाण म्हणजेच ‘निल दया पोकुना’-रावणाच्या गुपित महालाचे ठिकाण जे आताच्या एला शहराजवळ आहे.

यापुढील आकर्षण होते ते म्हणजे रामसेतू पूल.  आपण भारतातून रामेश्वरमधून जो रामसेतू पाहतो, तोच रामसेतू श्रीलंकेतून पाहण्याचा योग्य आलामन्नारबेटाहून काही अंतर प्रवास केल्यानंतर थलाईमन्नार लागते.  थलाईमन्नारहून ऍडम ब्रिज किंवा रामसेतू पाहता येतो.  अनुराधापुर शहराजवळस्थित मिहिनताल हे ठिकाण तीर्थंकरु तसेच पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे.  छोट्या सफेद रेतीसाठी प्रसिद्ध असलेले, समुद्रकिनाऱ्यालगतस्थित उनावायुना येथील रंगबिरंगी मासे आणि कासवे पाहून मन हरखून गेले.  मासेप्रेमी लोकांसाठी येथे विविध प्रकारचे मासे खाण्यासाठी उपलब्ध आहेत.  

उदावालवे नॅशनल पार्क हे अतिमनोहर ठिकाण पाहण्याचा अनुभवदेखील अवर्णनिय होता.  एकेकाळी श्रीलंकेला हत्तींचा  देश म्हणून ओळखलं जायचं, इतके हत्ती ह्या देशात होते.  कालांतराने तस्करी आणि इतर काही कारणांमुळे श्रीलंकेतील हत्तींचे प्रमाण फारच कमी झालेले आहे. उदावालवेमध्ये आम्हाला बरेचसे हत्ती पाहायला मिळाले.  इतकंच काय तर मोर, मगरी, हरीण तसेच इतर अनेक प्राणी सह्ज पाहायला मिळतात.  

रावणाचा धबधबा पर्यटकांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे.  या धबधब्यामध्ये पोहणे, भिजणे हा एक अविस्मरणीय अनुभव होता.

डांबुल्ला केव टेम्पल हि गुफा बौद्धधर्मीयांशी संबंधित आहे. माहितीनुसार दर पौर्णिमेस येथे खूप गर्दी असते.

अरुगम बे बीच हा श्रीलंकेतील सर्वात मोठा समुद्रकिनारा आहे.  कॅण्डी शहरातील टूथ टेम्पल हे एक पवित्र पर्यटन स्थळ आहे.  गौतम बुद्धांच्या दातांचे अवशेष इथे पाहावयास मिळतात.  कॅण्डीच्या पूर्वराजाच्या महालात हे मंदिर आहे.

पर्वतरांगांतून आणि जंगलातून जाणारी ट्रेन, अनेक पर्यटनस्थळे आणि येथील खाद्यसंस्कृतीचा पुरेपूर पाहुणचार घेऊन मन मोहित झाले होते.  पुन्हा एकदा इकडे भेट दिलीच पाहिजे असा विचार मनामध्ये पक्का करून कणखर आणि तरीही सुंदर अशा श्रीलंकेच्या पवित्र भूमीस वंदन करून आम्ही परत भारतात येण्यास सज्ज झालो.  

 

धन्य ती कुबेराची पवित्र सोन्याची भूमी!

 

 

 

©अनिता घेवडे 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top