♦ देवभूमी उत्तराखंड ♦

देवभूमी उत्तराखंड! स्वर्गभूमी ! खरोखर देव-देवता येथे वास्तव्यकरीत असावेत. हिमालयाच्या उत्तुंग पर्वत रांगा, पवित्र नद्या, हिमशिखरे, नेत्रदिपक भूप्रदेश, स्वर्गीय वातावरण, मन वेडावून टाकणारे नद्यांचे आणि पक्ष्यांचे विहंगम आवाज! आत्मा आणि परमात्मा यांचे जिथे मिलन होते, तीच हि देवभूमी उत्तराखंड!
जिथे खरोखरच देवांचा वास आहे, जिथे जगतनिर्मात्या महादेवाचे वास्तव्य आहे, पवित्र नद्या जिथे अखंडपणे वाहत असतात आणि तेथूनच अखंड भारतवर्षात प्रवाह करून लोकांची तहान भागवतात, तीच देवभूमी!
स्वर्ग, स्वर्ग म्हणजे तरी काय हे जर पाहायचे असेल, तर देवभूमी उत्तराखंडाशिवाय पर्याय नाही. निसर्गाचे अनेक चमत्कार आणि परमेश्वरी शक्तीचा पुरेपूर प्रत्यय आपणास येथे आल्यावाचून राहणार नाही.
इसवी सन २००० साली, भारतातील २७वे राज्य म्हणून उत्तराखंडाची स्थापना झाली. हिमालयाच्या कुशीत असलेले हे राज्य स्वतःचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक रूप अजूनही तसेच जपून आहे. तिबेट, नेपाळ, उत्तरप्रदेश, हरियाणा आणि हिमाचलप्रदेश ह्यांच्या सीमा उत्तराखंडाला लागून आहेत. गंगा, यमुना, अलकनंदा, मंदाकिनी, शरयू (सरजू), रामगंगा, पिंडार, नायर, मंदाकिनी, कोसी, काली, धौलीगंगा इत्यादी अशा अनेक लहानमोठ्या नद्या देवभूमीत वाहतात. आपल्या भारतदेशात ह्या नद्यांना फारच मोठे स्थान आहे. आपल्या देशात, संस्कृतीत आणि धर्मातदेखील ह्या नद्यांना देवतांचा मान आहे.

गुप्तकाशी, उत्तरकाशी, ऋशिकेष, बागेश्वर, हरिद्वार, केदारनाथ, पातळ भुवनेश्वर, नैनिताल, बद्रीनाथ, यमुनोत्री इत्यादी आणि अशा अनेक सुंदर आणि पवित्र स्थळांचे माहेर म्हणजेच आपले उत्तराखंड. पौराणिक ग्रंथ आणि काही ऐतिहासिक ग्रंथांनुसार, ‘केदारखंड’ व ‘मानसखंड’ ह्या नावाने उत्तराखंडाचा उल्लेख आढळतो. पौरव, कुशाण, गुप्त, कात्युरी, रायक, पाल, चंद, परमार,पयाल हे राजवंश तसेच इंग्रज यांनी ह्या प्रदेशावर राज्य केलेले आहे. अनेक सत्तांतरांनंतरही देवभूमीने आपले सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्व राखले आहे.
नैसर्गिक सौंदर्याने नटलेले ‘डेहराडून’ हे शहर उत्तराखंडाची हिवाळी राजधानी तर ‘गैरसैन’ ही उन्हाळी राजधानी आहे. डेहराडून हे राज्यातील सर्वात मोठे आणि महत्वाचे शहर आहे. दोन राजधान्या असलेले उत्तराखंड हे अश्या प्रकारचे भारतातील पाचवे राज्य आहे. प्रशासकीय कामामध्ये हिंदी भाषेला प्राधान्य दिले गेले आहे. तर गढवाली, कुमौनी, जौनसारी ह्या प्रमुख तसेच नेपाळी, बंगाली, उर्दू, पंजाबी, भोजपुरी अश्या इतरही भाष्या बोलल्या जातात. हिंदी व्यतिरिक्त ‘संस्कृत’ भाषेलाही अधिकृतरित्या दुसऱ्या स्थानाचे महत्वाचे स्थान दिले गेले आहे.
जोधा आणि चोची हे नृत्यप्रकार कुमौनी तसेच इतरही लोक प्रामुख्याने ह्याचा आनंद घेतात. इथल्या लोकांना ‘उत्तराखंडी’ म्हणूनच ओळखले जाते. गढवाली आणि कुमौनी हे त्यांच्या स्थानिक प्रदेशावरून (गढवाल आणि कुमौन) संबोधले जाते. ब्रिटिश इतिहासकारांच्यामते, शक, हून, नाग, खग, बिष्ट इत्यादी जातीसुद्धा येथे वास्तव्य करीत होत्या. शक हे देखील येथील प्रमुख आणि मूळ आदिवासी मानले जातात.
इथल्या निसर्गाप्रमाणेच इथली माणसे देखील तितकीच सुंदर, कणखर आणि सगळ्यांना आपलेसे करून घेणारी आहेत. आधुनिक शिक्षणातसुद्धा खूप प्रगती घडून आली आहे. निसर्गाने इथे खूप भरभरून दिलय तसेच निसर्गाचे महाभयंकर प्रतापही इथे पहायला मिळतात.
देश-विदेशातून अनेक पर्यटक येथे भेट देतात. इथल्या स्वर्गीय सौंदयाचा आनंद लुटतात. इथल्या प्रत्येक श्वासात स्वर्ग आहे. ईश्वर आणि नश्वर यातील फरक इथे आल्यावरच प्रत्ययाला येतो. ऐहिक सुखात गुंतलेल्या आपल्या मनाला इथे आल्यावर शून्यतेची जाणीव होते. इथल्या निसर्गाच्या सानिध्यात आपण आपली सारी सुखं-दुःख विसरून जातो. आणि हीच तर खरी जादू आहे. इथे आल्यावर मनाला मिळणारी शांती अवर्णनीय आहे. म्हणून एकदातरी देवभूमीला भेट द्याच!
कहते है यहाँ स्वर्ग से हवा आता है!
©अनिता घेवडे
