माझ्या आयुष्यातील शिवराय

“शिवराय”, हो शिवराय! आपण ज्यांचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असा करतो ते शिवराय! माझ्या लहानपणापासूनच मला महाराजांबद्दल अनामिक आकर्षण, कुतूहल होते.
अगदी लहानपणापासून जसजशी शब्दांची ओळख होऊ लागली, तसतशी महाराजांवर लिहिलेली पुस्तके, ग्रंथ जास्तीत जास्त वाचू लागले. छत्रपती महाराज म्हणण्यापेक्षा शिवराय म्हणण्यामध्ये जास्त आपुलकी वाटत होती. शिवराय माझे मार्गदर्शक, गुरु, मित्र, दैवत सारे बनले. शिवरायांच्या विचारधारेवर चालायचे, त्यांच्यासारखेच स्वाभिमानी, शूर, स्वदेशाबद्दल अभिमान बाळगून आयुष्य जगण्याचे ठरले.
शिवरायांमुळेच इतिहासाची आवड निर्माण झाली. महाराष्ट्र देश, मराठीपणा, स्वराज्य, हिंदुत्व यांबद्दल परकोटिची निष्ठा निर्माण झाली. खेळण्याबागडण्याच्या वयात शिवरायांनी स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली. कोवळ्या वयापासून ते अगदी आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत फक्त लोकांसाठी जगले. महाराज माझ्या स्वभावात, आचरणात भिणून गेले.
लहानपणापासून ते आतापर्यंत अगदी लहानतल्या लहान प्रसंगातही मी महाराजांना आदर्श मानूनच क्रिया करते. आयुष्यातील प्रत्येक संकटाला सामना करताना माझे शिवराय कसे वागले असते, असा विचार करूनच मी माझा निर्णय घेत असते.
माझ्या घरी शिवरायांची अगदी मोहक अशी मूर्ती आहे. देवानंतर महाराजांना मुजरा करण्याचा प्रघात कधीच टळत नाही. आयुष्यात आजवर अनेक चांगले वाईट प्रसंग आले, देवाच्या आणि आई-वडिलांच्या आशीर्वादासोबतच शिवरायांची प्रेरणा तितकीच महत्वाची आहे. शिवराय माझे मार्गदर्शक आहेत, माझे गुरु आहेत. आलेल्या संकटाशी गनिमी काव्याने, दूरदृष्टीपणाने व मुत्सद्दीपणाने वागण्याचे शिक्षण महाराजांकडूनच मिळते.
आदर्श जर कोणाचा ठेवून आयुष्यक्रमण करायचे असेल तर आदर्शही तितकाच मोठा हवा. शिवरायांसारखा युगपुरुष आपल्या मातीत जन्मला, घडला आणि त्यांनी नंतर आपल्याया घडवले.
लहानमुलांचे मन हे मातीसारखे असते आणि वळण लावण्यास अगदी योग्य. अशावेळी आपल्या महाराजांचा आदर्श त्यांच्या मनावर बिंबवला तर येणाऱ्या सगळ्यांना भावी पिढ्या कृतकृत्य होतील.
जय शिवराय!
© अनिता घेवडे
